रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

नव युगातील नवरात्रीची नव रूपे

हिंदू धर्मामध्ये सणावारांचे अनन्य महत्व आहे.हे सणवार नसते तर मनुष्य जन्माला आला काय आणी गेला काय, काहीच अर्थ राहिला नसता. सण म्हणजे उत्सव असतो. प्रफुल्लीत मन, आनंदी चेहरा, निर्मळ भावना यांचा सुरेल संगम असतो. प्रत्येक सणावारा मागे काही तरी कथा, शास्त्र, विज्ञान, ईतिहास नक्कीच आहे. कारण हिंदूलोक अविचाराने काहीही करत नाहीत. प्रत्येक सण वेगळा, त्या प्रत्येक सणाची मजा वेगळी, देवी-देवते सोबतच निसर्ग, पशु-पक्षांची पुजा ही करतो.
प्रत्येक सण आप-आपल्या एेपती प्रमाणे साजरा करण्याची मुभा. दिवाळीला श्रीमंत व्यक्ती पन्नास हजाराचे कपडे घेऊ शकतो तर, गरीब पाचशेचे घेऊन त्याच एेटीत मिरवतो. श्रीमंत सगळ्या घरावर रोशनाई करतो तर गरीब पाच पणत्या लावून आपली झोपडी प्रकाशाने भरतो. एकमेकांना भरभराटी,चांगले आरोग्य, संपन्नतेच्या शुभेच्छा देतो.वेगवेगळी पक्वान्नं देत, घेत खातो. देशाच्या आर्थिक विकासाला अशाच प्रकारे चालना देतो. कारण जगातील अनेक जाती,धर्माचे लोक जिवंत आहेत हिंदू धर्मियांच्या सणांमुळे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या वस्तुंची खरेदी- विक्री होते व मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.
आज विजया दशमी दसरा. याची सुरूवात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत निराळी. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात. एकुणात नऊ दिवस धावपळीचेच असतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. त्यासाठी गोंधळी बोलावले जातात. अर्थात यावत तेलम् त्यावत् आख्यायनम् हे आलेच.
देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते.
स्त्री शक्तीचा सन्मान करणारा हा सण.
आई, आजी, मावशी व आत्या, बहिण , पत्नी, भाची व पुतणी, मुलगी, सून व परस्त्री ही नवरात्रीची नऊ रूपे आहेत. प्रेम, समर्पण व सहनशिलतेचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री.
आजच्या दिवशी माझ्यी जीवनात असलेल्या सर्व स्त्रीयांना सलाम व खुप खुप प्रेम.

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

कोरोना काळामध्ये मातृभूमी प्रतिष्ठान मदतीला

Annapurna Yojna

कोरोना काळामध्ये मातृभूमी प्रतिष्ठानने वाटले एक लाख जेवणाचे डबे
दिनांक 23 मार्च, 2020 पासून समग्र भारतामध्ये लॉक डाऊन घोषित झाला , आणि गरीब, बेघर, कामगार लोकांचे अतोनात हाल सुरू झाले , अनेक जण बाहेरगावी अडकले अशा परिस्थितीमध्ये मातृभूमी प्रतिष्ठानने जेवणाचे डबे पोच करण्याचं काम सुरू केलं. दररोज तब्बल दोन हजार डबे वितरित करण्यात येत होते. प्रतिष्ठान मार्फत मास्क व सैनी टायझर देखील वाटण्यात आले. सलग चाळीस दिवस मातृभूमी प्रतिष्ठानचे संचालक मंडळ, सभासद या सर्वांनी अत्यंत मेहनतीने हे काम पूर्ण केले . बार्शी शहरांमध्ये एकही व्यक्ती उपाशी झोपू नये याची आम्ही संपूर्णपणे काळजी घेतली. सदर कालावधीमध्ये बार्शी शहरातील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट व त्यांचे नातेवाईक अडकलेले होते त्या सर्वांना देखील मोफत डबे वितरीत करण्यात आले. दिनांक 17 जुलै,2020 पासून परत एकदा बार्शी शहरांमध्ये दहा दिवसांचा लॉक डाऊन सुरू झाला व आम्ही परत सर्व गरजूंना घरपोच डबा देण्याचे काम अविरतपणे करत आहोत.
तसेच बार्शी नगर परिषदेच्या सहकार्याने बार्शी शहरातील काही वॉर्डांमध्ये ट्रॅक्टरद्वारे सॅनिटायझर फवारणी केली.
यापुढेही केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने मातृभूमी प्रतिष्ठानला एखादा सामाजिक उपक्रम राबविण्यास सांगितल्यास आम्ही तो आनंदाने राबउ.
Annapurna Yojna, Matrubhoomi Pratishthan

दिनांक 15 जून 2014 रोजी बार्शी शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्तम यश मिळविलेल्या व ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाप्रति आपलं काहीतरी देणं आहे या भावनेतून वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे अध्यक्ष एकत्र आले व त्या सर्वांनी बार्शी शहर व तालुक्यामध्ये वंचित असणाऱ्या लोकांसाठी व्यापक स्वरूपात कार्य करण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानची स्थापना केली.
ग्रामीण भागामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट बसविण्यात आले , महिलांसाठी निवारा शेड उभी करण्यात आली , जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांसाठी चार प्रकारची खेळणी बसविण्यात आली बालवाडीतील मुलांना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले केशर आंब्याची रोपे दिली गेली , ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबीर, जलसंधारण अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यात आली . त्यानंतर खामगाव सुर्डी व श्रीपत पिंपरी येथे वृद्ध विकलांग निराधार व्यक्तींना रोज दोन वेळेस पुरेल एवढा डबा देण्याचा उपक्रम अन्नपूर्णा योजना या नावाने चालू करण्यात आला . तसाच उपक्रम बार्शी शहरांमध्येही चालू करण्यात आला व बार्शी शहरांमध्ये 164 लाभार्थी नियमित याचा लाभ घेत आहेत .
ग्रामीण भागातून बार्शी शहरांमध्ये वैद्यकीय सेवा घेण्याकरिता मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात . काही कारणास्तव त्यांची जेवणाची सोय होत नाही ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठानने अवघ्या दहा रुपयात दोन चपाती व भाजी किंवा वरण भात हॉस्पिटलमध्ये देण्याचे चालू केले . पेशंटच्या नातेवाईकांना मोफत वापरासाठी चादर सतरंजी उपलब्ध करून देण्यात आली .
एमपीएससी यूपीएससी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ मार्गदर्शन द्वारे स्पर्धा परीक्षेविषयी माहिती देण्यात येते , त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येते . तसेच विविध शासकीय योजनांची माहिती अनेकांना नसते त्या सर्व योजना समजावून सांगणे त्याचे मोफत फॉर्म भरून देणे व त्याचा फॉलॉवर घेणे इत्यादी कामेही प्रतिष्ठान मार्फत केली जातात .
मातृभूमी प्रतिष्ठान हे 12 A, 80G व FCRA नोंदणीकृत आहे .
प्रतिष्ठानला आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा समाज कल्याण विभागाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

Annapurna Yojna

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

विटे समोरील पांडूरंग

जगातील एकमेव प्रेमळ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय.
जीवन जगत असताना आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेणारा संप्रदाय.
समोरचा आपल्या पुढे झुकला तर आपणही त्याच्यापुढे झुकणे म्हणजे वारकरी संप्रदाय.
कर्म हाच धर्म, आणी धर्म म्हणजेच विठ्ठल असे माननारा.
घरी अठरा विश्व दारिद्र्य असले तरी मनाने मात्र कुबेराचा धनी.
पंढरपूर हाच स्वर्ग आणी चंद्रभागा म्हणजे अमृताने दुथडी वाहणारी नदी.
पांडुरंगावरती निस्सीम श्रध्दा परंतु अंधश्रध्देला कुठेही थारा नाही.
आपल्याकडे असणार्या समुद्रातून ओंजळ भरून देणारे तर अनेक असतात परंतु आपल्या फाटक्या झोळीत मुठभर असतानाही आपले सर्वस्व अर्पण करणे म्हणजे वारकरी.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काळीज, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर जीवण जगणारा वारकरी.
पसायदानामध्ये सर्व विश्वाचे कल्याण होवो अशी इच्छा व्यक्त करणारे संत ज्ञानेश्वर,
प्रपंच करत असतानाही भगवद भक्ती करणे म्हणजेच जगदगुरु संत तुकाराम महाराज.
संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा आमचा महाराष्ट्र.
कपाळी टिळा, गळ्यात माळा, दिनांचा कैवारी विठू सावळा.
"यावत चंद्र दिवाकरो" असणारा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय.

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

"प्रेमास्ते" कविता


माझ्या समोर ती आहे
तीझ्या समोर मी आहे
मी तीला, ती त्याला पाहत आहे.


मी प्रेमात आहे,
ती प्रेमात आहे,
माझे तीच्यावर, तीचे त्याच्यावर प्रेम आहे.


मला लग्न करायचे आहे
तीला लग्न करायचे आहे
मला तिच्याशी, तीला त्याच्याशी लग्न करायचे आहे.


माझा संसार सुखाचा आहे
तीझा संसार सुखाचा आहे
माझा माझ्या बायको सोबत, तीचा तिच्या नवर्यासोबत आहे.


मला तिची आठवण येत नाही
तिला माझी आठवण येते आहे
मी काही करणार नाही, तिला काही करू देणार नाही.

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

🧹 स्वच्छता ठेवूया गांधीखातर 🧹

Narendra modi, mahatma gandhi, peace, cleanliness, india
     ज्या भारताला हजारो  वर्षांचा वारसा आहे, ज्या भारताने एकेकाळी सर्व जगाला तंत्रज्ञान, आध्यात्म व जीवन जगायला शिकविले त्या भारतामधील लोकांनाच स्वच्छतेविषयी प्रेरीत करावे लागतेय हे आपले दुर्दैव आहे. अजुनही आपल्याला कचरा रस्त्यावर टाकु नका, शौचालयाच वापर करा, इतरत्र थुंकू नका म्हणून समजवावे लागतय.

     दोन वर्षापूर्वी  माझे मित्र जपानच्या दौर्‍यावर गेले होते तेंव्हा त्यांनी सांगितलेला अनुभव असा आहे की,  जपान या देशमध्ये फिरल्यानंतर कळतेकी देशभक्ती कशाला म्हणतात, कारण तेथे घाण  व कचरा तेथील नागरिक स्वत: करत नाहीत व इतरांना करूही देत नाहीत. जपानमधील शाळेचा पहिला तास हा स्वच्छतेचा असतो, विद्यार्थी व शिक्षक पहिला तास वर्गाची व परीसराची स्वच्छता करण्यात घालवतात. कचरा डस्टबीन मध्येच टाकला जातो मग तो घरी असो किंवा बाहेर, आपण मात्र डस्टबीन नाही हे कारण पुढे करतो परंतु आपण एखादा रिकामा बॉक्स जर कचरा गोळा करण्यास शाळा, कॉलेज, मंदीर, किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी ठेवला तर त्याचा उत्तम डस्टबीन म्हणुन वापर होऊ शकतो.

clean india, swach bharat, tajmahal, lal killa
    जपानमध्ये एके  दिवशी सकाळी एक  स्त्री तिच्या कुत्र्याला फिरायला घेउुन निघाली. रस्त्याच्याकडेला त्याकुत्र्याने घाण केली, त्या स्त्रीने आपल्या पर्समधून एक कॅरीबॅग काढली व ती घाण त्या पिशवीत भरली, ती पिशवी लगेश शेजारच्या कचरा कुंडीत टाकली. सॅनिटायझरने हात स्वच्छ केले व पर्समधून एक स्प्रे काढला व या ठिकाणी कुत्र्याने घाण केली होती त्याच्यावर स्प्रे केला. तिने ती जागा निर्जंतुक केली. आपल्या देशातील परिस्थिति अत्यंत विरोधी आहे. आपण घरातील कचरा रस्त्यावर टाकतो व आपल्याच देशाला नावे ठेवतो.

   जपानमधील सर्व सरासरी आयुष्यमान हे  जगातील इतर लोकांच्या आयुष्यमानापेक्षा ५ ते १० वर्षानी जास्त आहे. स्वच्छतेचा परिणाम शारीरीक, मानसीक व बौध्दिकतेवर होतो असे तर विज्ञानसुध्दा सांगते कारण स्वच्छता असेल तर शरीर सुदृढ राहील, शरीर सुदृढ असेल तर मन व बुध्दि सुदृढ राहू शकते. स्वच्छता ही जबरदस्तीने न करता ती स्वेच्छेने प्रत्येकाने ठेवली पाहिजे. साधे एखादे चॉकलेट किंवा बडिशोप पुडी जरी खाल्ली तरी त्याचे रॅपर लगेच डस्टबीन मध्ये टाकले पाहिजे, जर डस्टबीन उपलब्थ नसेल तर ते रॅपर खिशात ठेवून जेंव्हा डस्टबीन मिळेल तेव्हा त्यात टाकले पाहीजे. अशा प्रकारे आपण वागलो तरच आपला परिसर, गाव व देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

     आज गांधी जयंती निमित्त आपण संकल्प करूया की, स्वच्छता ही आपल्या पासून सुरू करू.

gandhi jayanti, 2nd october, cleanliness